या संकेतस्थळास भेट देणाऱ्या शिक्षक,विद्यार्थी,पालक व सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत..!

Monday, 16 August 2021

 

प्रस्थापितांची अवैज्ञानिक विचारसरणी सर्वसामान्यांच्या मुळावर...!

शिवाजी कराळे, सहशिक्षक कें.प्रा.शा. ब्रँच मुखेड

भारतीय समाज हा विविधतेने नटलेला,सर्वसमावेशक संस्कृतीप्रधान देश आहे.विविधतेतून एकता हे आपले बलस्थान.जगातील सर्वातील मोठी लोकशाही व्यवस्था असूनही सर्वसामान्य भारतीयांच्या मनात लोकशाही मुल्यांची रूजवणूक होऊन दैनंदिन जीवनात याच मूल्यांचे प्रतिबिंब आपल्याला पाहावयास मिळते.आचार व विचार स्वातंत्र्यही राज्यघटनेनुसार दिलेला मौलिक अधिकार सर्वांना प्राप्त झाला आहे.असे असले तरी स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव साजरा करत असताना आजही भारतीय जनमानसात सहिष्णुता,बंधुभाव व वैज्ञानिक विचारसरणी यांची रुजवात व्हावी ही संविधानकर्त्यांची अपेक्षा पूर्ण झाली का ? या प्रश्नांचे उत्तर समाधानकारक किंवा होकारार्थी मिळत नाही.याऐवजी संकुचित राष्ट्रवाद,अवैज्ञानिक विचारसरणीचे उच्चाटन होणे अपेक्षित असताना दुर्दैवाने या बाबीला खतपाणीच मिळत असल्याचे दिसून येत आहे.परिणामी हीच विचारसरणी सर्वसामान्यांच्या मुळावर उठत आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

          कोणत्याही समाजात उच्चशिक्षित व प्रस्थापित व्यक्तींचा गट धोरण निर्मिती व त्याचे सामाजिक अभिसरण करण्यासाठी सहाय्य्यक व प्रभावी ठरत असतो.त्यांच्या आचार-विचारांचा दूरगामी प्रभाव सर्वसामान्यांच्या जीवनावर पडून त्याचे अनुकरण व अनुनय सर्वसामान्यांकडून होत असते.या सर्व बाबीचा उहापोह करण्याचे कारण म्हणजे कोरोना संक्रमण काळात निर्माण होत असलेला विचारसरणीतील गोंधळ.गेल्या दीड वर्षापासून संपूर्ण जग या नैसर्गिक आपत्तीशी मुकाबला करण्यास असमर्थ-हतबल असल्याचे दिसून आले आहे.शैक्षणिक व आरोग्य व्यवस्था याबातीत आपण अजूनही विकसीत देशांपेक्षा निश्चितच मागे आहोत ते सत्य नाकारण्यात अर्थ नाही.आरोग्य व्यवस्था व लोकसंख्या यांचा ताळमेळ घालताना शासन यंत्रणा मेटाकुटीस येत आहे.कोविड-19 च्या साथीने हे ठळकपणे अधोरेखित केले आहे.आरोग्य व्यवस्था-शासन यंत्रणा यांच्याकडून आटोकाट प्रयत्न करूनही निश्चित ध्येयधोरणाची अंमलबजावणी करता आली नाही.

          अश्या स्थितीत प्रस्थापितांकडून समाजव्यवस्थेला दिशादर्शक व भरीव योगदानाची अपेक्षा असते.आपला जीव धोक्यात घालून दिवसरात्र आपल्या कुटुंबाची पर्वा न करता कोरोनाग्रस्त रुग्णांची सेवा करणाऱ्या घटकांना साहाय्य करण्याऐवजी दुर्दैवाने त्यांचे कार्य व मनोधैर्य खच्चीकरण करणाऱ्या घटना घडत आहेत.कोविड लसीकरणाच्या बाबतीतही जनप्रबोधन करण्याऐवजी गैरसमज निर्माण केले जात आहेत.समाजातील ‘बुवा-बाबा’ यांच्यासह काही राजकारणी मंडळी आपला वैयक्तिक स्वार्थ जपण्यासाठी जाणीवपूर्वक अवैज्ञानिक दृष्टीकोन जोपासून त्याला खतपाणी घालत आहेत.यातून वैद्यकीय ज्ञान व वैज्ञानिक विचारसरणी यांचा गोंधळ निर्माण केल्या जात असून प्रतिगामी विचारसरणी जोपासली जात आहे.आपल्या देशात अंधश्रद्धा जोपासणारे अनेक ‘बुवा-महाराज’ रोज तयार होत आहेत.असंख्य वैज्ञानिक,डॉक्टर,समाजसेवक व लोकप्रतिनिधी यांनी आवाहन करूनही अनेक धार्मिक कट्टर विचारसरणीच्या संघटना,वेगवेगळे बाबा-साधूसंत मात्र विवेक व विज्ञानाधारित दृष्टीकोन स्वीकारायला तयार नाहीत.काही शिक्षित व प्रतिभावान लोकही यांचे अनुयायी बनून त्यांच्या भोंदुगिरीला व भूलथापांना सहज बळी पडत आहेत याचे वाईट वाटते.मग अशिक्षित व सर्वसामान्य यांच्याकडून वैज्ञानिक विचारसरणीवर आधारित वर्तणुकीची अपेक्षा कशी करावी ?

          या सर्व बाबी समाजाचे पर्यायाने देशाचे अपरिमित नुकसान करत आहेत,म्हणून अशा अवैज्ञानिक, बाबाछाप विचारसरणीचा निषेध होणेही तेवढेच महत्वाचे आहे.अशी प्रतिगामी विचारसरणी अधिक गोंधळाचे वातावरण निर्माण करून सर्वसामान्यांच्या मुळावर उठत आहेत.सर्वसामान्य लोकांचे प्रबोधन करून त्यांच्या मनातील अस्वस्थततेचे उच्चाटन होण्यासाठी लोकांच्या मनात असलेली वैद्यकीय उपचारपद्धती व लसीकरणाची भीती दूर करून आश्वासक व निर्भय वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. देशातील सामान्य लोकांच्या जीवांशी खेळ न करता प्रस्थापित वर्गाकडून दिशादर्शक,पुरोगामी,विज्ञानाधारित वर्तणुक व पुढाकाराची अपेक्षा आहे.

No comments:

Post a Comment