समाज माध्यमांच्या पलीकडचं जग
शिवाजी कराळे,मुखेड
व्यक्तींना
व्यक्त होण्याचं साधे सोपे माध्यम म्हणून समाज माध्यमांनी अलीकडील काळात
महत्त्वाचे स्थान निर्माण केलं आहे.माहिती आणि तंत्रज्ञान युगात खऱ्या अर्थाने
वेगाने विकास झाला तो प्रसारमाध्यमांचा. त्यातूनच त्यांच अपत्य असलेल्या
समाजमाध्यम हे तेवढच किंबहुना त्यापेक्षा जास्त लोकांपर्यंत अगदी कमी कालावधीत
पोहोचण्याच्या क्षमतेने समाजातील प्रत्येक घटकात त्यांच्या रुची व आवडीनुसार आपले
स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. हे आपण मान्य केलेच पाहिजे.बुद्धिमान शिक्षित
पांढरपेशा वर्गापासून विद्यार्थी, व्यवसायिक तसेच अगदी अशिक्षित व्यक्तीसह अगदी
मोलमजुरी करणाऱ्या समूहातील व्यक्तीपर्यंत सर्वांना समाज माध्यमाने आपल्या
क्षमतेने आकर्षित केले आहे.
अलीकडील
काळात रूढ झालेला परवलीचा शब्द म्हणजे सेल्फी(Selfi). यातून व्यक्तीला भौतिक
दृष्टीने नक्कीच व्यक्त होण्याची संधी मिळाली आहे,परंतु नकळत यात मीपणाचा प्रवेश
होऊन सेल्फीचा प्रवास सेल्फीश (Selfish) पणाकडे होत आहे. मग सेल्फलेस(Selfless)
कधी होणार ! या प्रश्नाचं उत्तर मात्र मिळत नाही समाज माध्यमं म्हणजे फेसबुक,
व्हाट्सअप, ट्विटर अशा अनेक संकल्पनांचा एकत्रित अर्थ. स्मार्टफोनच्या विकासासोबतच
ही समाजमाध्यमं लोकप्रिय होत गेली.यामध्ये एक बाब फार महत्त्वाची आहे ते म्हणजे
सर्व समाजघटक व वयोगट यामध्ये ती तेवढीच
लोकप्रिय होत आहेत. समाजमाध्यमांना एवढे महत्व का आले असेल याचा विचार करताना
त्यातील उपयुक्ततेचा शोध घेणे आवश्यक आहे.प्रत्येक व्यक्तीच्या अंतर्मनात स्वतःला
व्यक्त होता यावे यासह प्रसिद्धीची अल्प किनार असते.म्हणून ही बाब समाजमाध्यमातून
निश्चितच सहजपणे साध्य होते.मग कधी कधी याला समाजसेवा किंवा परोपकाराचे रूपही दिले
जाते. एखाद्या गरजूला थोडीशी मदत करून त्याच्यासोबत आपले छायाचित्र काढून ते अनेक
ठिकाणी फिरवले वा मिरवले जाते व फार काही केल्याच्या अविर्भावात समाजसेवक ही
उपाधीही सहजसाध्य वाटू लागते. परंतु यातून आपण संबंधिताच्या दुःखावर फुंकर मारत आहोत
की त्याऐवजी त्याच्या गरीबी,लाचारी किंवा जखमेचे भांडवल करून आपला छंद पूर्ण करत आहोत
याचेही समाजभान नसणे ही शोकांतिका आहे. म्हणून प्रसिद्धी ऐवजी गरजूंच्या मदतीचे
साधन होणे ही आजची खरी गरज आहे.म्हणून स्वस्तातील लोकप्रियतेच्या नादाने
विश्वासाहर्ता मात्र गमावली जात आहे हे निश्चित.
माहिती-तंत्रज्ञान
क्षेत्राने जग जवळ आणले आहे व्यक्ती व्यक्ती मधील भौगोलिक अंतर कमी झाले आहे. हे होण्यासाठी
समाजमाध्यमानेही महत्त्वाची भूमिका पार पडली आहे.माणसांना जोडण्याचे काम निश्चित
झाले, परंतु त्यांच्यामध्ये आपलेपणा व मानसिक ओलावा खरच आला का ? याचे उत्तर मिळेल
ते मिळो. पण एकत्र असलेल्यांमध्ये बरेच मानसिक अंतर व दुरावा मात्र वाढला किंबहुना
वाढत आहे. प्रत्येक जण समूहामध्ये असूनही अनेकदा एकटाच वावरत असल्याचे चित्र आपणास
पहावयास मिळत आहे. कौटुंबिक नात्यातील घट्ट असलेली विन सैल होताना मात्र दिसत आहे.
अनेक ठिकाणी चार मित्र एकत्र जमूनही प्रत्येक जण आपल्या हातातील मोबाईल हाताळताना
किंवा चाळताना आपणास दिसतो.एवढेच नाही तर आई वडील वा त्यांचे पाल्य यांच्यातील
पूर्वी असणारा संवादही हळूहळू लोप पावत चालला आहे. प्रत्येकाचा वेळ नात्याऐवजी
आभासी जगातील वास्तव शोधण्यात जात आहे. वाचन संस्कृती आता जवळपास हद्दपार झालेली
आहेच.गुगल सारख्या साधनांनी स्मरणशक्तीलाच पर्याय उपलब्ध करून दिलाय का याचाही
विचार सहज मनात रेंगाळतो. हल्ली संयुक्त कुटुंबाचे अस्तित्व फारसे आढळत नसल्याने
आजीबाईच्या गोष्टींची जागा आता ॲनिमेशनमधील पात्रांनी कधीच घेतली आहे.परिणामी
विद्यार्थ्यांना अपयश पचवण्याची ताकद व धीर देणारा पालकांचा त्यांच्यासोबत असलेला संवादही
लोप पावत चालला असून एक अदृश्य भिंत पालक व बालक यांच्यात निर्माण झाली आहे.
विद्यार्थ्यांना
नकळतपणे आपल्यातील सहज सुलभ भावना व्यक्त करण्यासाठी,आलेले नैराश्य लपवण्यासाठी
किंवा वेळ घालवण्यासाठी समाज माध्यमांतील आभासी जगाचा आधार शोधत आहे. हीच भावना
कमीजास्त प्रमाणात सोबतच्या मित्र-मैत्रिणींत आढळत असल्याने त्यांचा जास्त आधार
मुलांना वाटणे साहजिक आहे. दुर्दैवाने अश्या घोळक्यांचा त्याला आधार वाटत असून
त्यातून अभ्यासाकडे होणारे दुर्लक्ष व वेळेचा अपव्यय याकडे कोणाचेही लक्ष जात नाही
हे वास्तव आहे. या सर्व बाबींमुळे अभ्यास करताना मनाचे केंद्रीकरण होणे जवळजवळ अशक्यच.समाज
माध्यमातून व्यक्त होणाऱ्या भावना होत असलेली करमणूक यांची फारशी चिकित्सा करण्याची तसदी कोणी
घेताना दिसत नाही.मग यातून सहज नकळतपणे काही सवंग व विकृत विचार,तेढ निर्माण
करणाऱ्या बाबी,सामाजिक अफवा बिनदिक्कतपणे वाऱ्याच्या वेगाने पसरत असतात किंवा
जाणीवपूर्वक पसरवल्या जातात.यासाठी मग पुन्हा हा समाज माध्यमांनाच दोषी धरले जाते.
एक
सजग नागरिक म्हणून आपले सामाजिक उत्तरदायित्व ओळखून आपल्या अपरिपक्व वर्तणुकीने
समाजाचे नुकसान तर होईलच,परंतु आत्मिक समाधानही नक्कीच मिळणार नाही. ह्याचे भान ठेऊन
वागणे गरजेचे आहे.तसेच याच भावनेतून समाज
माध्यमांना हाताळणे गरजेचे आहे.अन्यथा सामाजिक विद्वेष निर्माण करणाऱ्या,आपल्या
जबाबदाऱ्या झटकून बेजबाबदार बनवणाऱ्या या कोरोनाचे समाजात झालेले संक्रमण कसे
रोखणार.आणि हेचसंक्रमण सामाजिक सलोखा व नात्यातील विश्वासाहर्ता यांचा बळी
घेतल्याशिवाय राहणार नाही.म्हणून समाजमाध्यमं म्हणजे साध्य नसून साधन
आहे.त्यापलीकडे व्यक्ती समाज व देशहिताच्या दृष्टीने आवश्यक व विधायक वापर झाला
पाहिजे याच भान मात्र असायला हवं.

No comments:
Post a Comment