या संकेतस्थळास भेट देणाऱ्या शिक्षक,विद्यार्थी,पालक व सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत..!

Tuesday, 14 April 2020


कोरोनामुळे लॉकडाऊन : अस्वस्थ प्रश्नांची मालिका
(शिवाजी कराळे,सहशिक्षक कें. प्रा.शा.ब्रँच मुखेड)


                चीनमधील वुहान प्रांतातून सुरुवात झालेल्या कोरोना या विषाणूच्या साथीने अतिशय अल्प कालावधीत जगातील जवळ जवळ सर्वच देशातील प्रांतात आपले हातपाय पसरले आहेत.अचानक उद्भवलेल्या या नैसर्गिक आपत्तीने अमेरिका, इटाली, स्पेन, इराण, फ्रांस व इंग्लंड यासारख्या आर्थिक महासत्ता असलेल्या देशांना दररोज हजारोंच्या संख्येने तयार होणारे नवीन रुग्ण व मृत्यूमुखी पडणारे नागरिक ही अवस्था हताश व असहाय्यपणे पाहण्याशिवाय अन्य पर्याय शिल्लक राहिलेला नाही.इटाली व अमेरिकेसारख्या उत्कृष्ट आरोग्य व्यवस्था असलेल्या देशाची अशी बिकट अवस्था आपल्या भारत देशासारख्या विकसनशील व मर्यादित आरोग्य व्यवस्था असलेल्या देशापुढे निर्माण झाल्यास काय ? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.परिणामी संपूर्ण जागतिक मानवजातीच्या समोर प्रचंड आव्हान असणार आहे.
              या सर्व बाबीपासून आपण फार काळ दूर राहू शकत नाही हे वास्तव नजरेआड करणे परवडणारे नाही.जागतिक परिस्थितीचे गांभीर्य ओळखून केंद्र व राज्य सरकारने तातडीने पावले उचलण्यास वेळीच सुरुवात करूनही आज आपल्या देशातही वरील देशासारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे.कोणताही नफा-तोटा यासारखा व्यावहारिक विचार न करता महाराष्ट्र शासन व केंद्र शासन धीरोदत्तपणे परिस्थितीशी दोन हात करत आहे,परंतु समाजाकडून मिळणारे सहकार्य मात्र अजूनही तोकडेच आहे. मला काय त्याचेअशी बेफिकीर व निर्ढावलेली वृत्ती अद्यापही दूर झालेली दिसत नाही.याचे दु:ख वाटते.देश व समाजासाठी ही धारणा दीर्घकाळासाठी आत्मघातकी ठरेल.
             कोरोना विषाणू संक्रमणाच्या साथीमुळे भारतीय समाजव्यवस्थेतील भीषण वास्तवही प्रकट होत आहे. जेमतेम आर्थिक विकासदर असल्यामुळे लॉकडाऊनमुळे होणारे आर्थिक नुकसान आपल्याला परवडणारे नसूनही आपण तो पर्याय स्वीकारला आहे,कारण लोकशाही शासनव्यवस्थेत आर्थिक बाबीपेक्षा आरोग्य व्यवस्था ही प्राध्यान्यक्रमात वरच्या स्तरावर असणे अपेक्षितच असते. यापुढील काळात घसरणीनंतर अर्थव्यवस्था कोणत्या स्तरावर थांबेल याबाबत कोणताही अर्थतज्ञ आज भाकीत करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. याचे अनेक दूरगामी परिणामी संपूर्ण व्यवस्थेवर निश्चितच होणार आहेत.यामुळे संपूर्ण भारतीय समाजमन अस्वस्थ आहे.भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या, धार्मिक विविधता असलेल्या देशात प्रत्येकजण आपले सामाजिक भान व उत्तरदायित्व, जबाबदारी ओळखून वागला तरच  परिस्थितीत सुधारणा होणे शक्य होईल.
            कोरोनाच्या संक्रमणापासून सुरक्षित राहण्यासाठी लॉकडाऊन केले तरी त्यामुळे निर्माण झालेल्या समस्या दाहक वास्तव दर्शवणाऱ्या आहेत.दररोज काम करून उदरनिर्वाह करणारा मजूर-कामगार वर्ग,बेकार- बेरोजगार व दोनवेळेच्या जेवणाचीही पुरेशी व्यवस्था नसलेला वर्ग यामध्ये सर्वात जास्त भरडला जात आहे.घराच्या ओढीने अनेक लोकांचे जत्थेच्या जत्थे 400 ते 500 किलोमीटरचे अंतर तोडून मिळेल त्या वाटेने व मार्गाने जीवाची तमा न करता मार्गक्रमण करत आहेत,चालत आहेत.आपल्या मुलांबाळाची होत असलेली उपासमार सहन न झाल्याने त्यांच्यासह आत्महत्या करणारी माता या घटना मनाला चटका लावणाऱ्या आहेतच.महाराष्ट्र व इतर अनेक राज्यात स्थलांतराचे प्रमाण प्रचंड आहे.रोजगाराच्या संधीच्या शोधात गेलेले शेकडो मजूर विविध ठिकाणी अडकून पडलेले आहेत. त्यांच्या उदरनिर्वाहासाठी राज्यसरकार,स्वयंसेवी संस्थासह अनेक दानशूर व्यक्तीनी सुरु केलेल्या मदत छावण्याच्या आधारावर ते आलेले दिवस काढत आहेत.परंतु ही व्यवस्था तोकडी व कामचलाऊ असते.हे मान्य करावेच लागते.यापेक्षा गंभीर प्रश्न आहे तो स्वतःच्या व मुलांच्या भवितव्याचा.आज अनेक लहान सहान उद्योगापासून ते मोठ्या उद्योगापर्यंत सर्वच रोजगार पुरवणारे उद्योग बंद आहेत.अनेक तोट्यातील उद्योग पुन्हा उभे राहतील याची शाश्वती वाटत नाही.
              शेतीक्षेत्रही यापासून अलिप्त नाही.पावसाच्या लहरीपणामुळे यावर्षी राज्यात शेतीतील जवळजवळ सर्व हंगाम वाया गेले आहेत.हातातोंडाशी आलेल्या रब्बी व उन्हाळी हंगामातील पिके कोरोना संक्रमणामुळे व अवकाळी पाऊस अशा दुहेरी नैसर्गिक आपत्तीमुळे वाया जाण्याच्या मार्गावर आहे.कामाशियाय मजूर बसून आहेत तर काढणी विना फळे,भाजीपाला व अन्नधान्य इत्यादी पिकांची होत असलेली नासाडी पहावत नाही. यामुळे  सर्व परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याचा धोका आहेच.
    घटलेला महसूल व रिकाम्या होत चाललेल्या तिजोरीसह शासन यंत्रणा कितपत आणि कोणकोणत्या समाजघटकांपर्यत पोहचेल याला मर्यादा पडतील.एका अंदाजानुसार खाजगी क्षेत्रातील 4 कोटींपेक्षा जास्त जणांना नोकऱ्या गमवाव्या लागतील.बेकार हातांची संख्या वाढेल व तरुणांचे भवितव्य अंधकारमय होईल याची भीती सतावत आहे. या सर्व बाबी मानवीय दृष्टीकोनातून हाताळाव्या लागतील.सामाजिक उत्तरदायित्व व दातृत्व जपणाऱ्या, स्वदेश हिताला प्राधान्य देणाऱ्या असंख्य समाजनायकांच्या हाताची आज देशाला गरज आहे. म्हणून कोरोना व लॉकडाऊनमुळे झालेली राज्य व समाज व्यवस्थेची प्रचंड हानी कधी भरून निघेल ? याचे समाधानकारक उत्तर आजघडीला नाही.समाजातील प्रत्येक घटकात आपल्या असुरक्षिततेची असलेली भावना कशी दूर करता येईल ? समाजातील नाहीरे वर्गातील ही भावना कमी करून त्यांना सोबत घेऊन पूर्वीच्याच सामाजिक सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करून जगण्यास समर्थ करण्याचे,देशातील प्रत्येक व्यक्तीत आपले भवितव्य सुरक्षित नाही अशी निर्माण झालेली नकारात्मक भावना दूर करण्याचे प्रचंड आव्हान यापुढील काळात आपल्या सर्वांपुढे असेल.लेखक हेरंब कुलकर्णी यांच्या शब्दात,"दारिद्र्याच्या विषाणूपुढे 15 दिवसही तग न धरू शकणारे लाखो कुटुंब या देशात आहेत.कोरोना जाईलही पण गेल्या 70 वर्षांपासून असलेला हा विषमतेचा विषाणू कसा जाणार ?" हा प्रश्न सतत मनाला भेडसावतच राहणार हे मात्र निश्चित.